दरभंगा(बिहार)- राज्यातील उत्तर बिहारमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. यामुळे विविध जिल्ह्यांना पुराचा धोका निर्माण झाला आहे.
मुझफ्फरपूर,मोतिहारी, दरभंगा आणि सितामढी यांना पुराचा फटका बसत आहे. उत्तर बिहारमधून वाहणाऱ्या नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत.
शिओहर जिल्ह्यातील बेलसंद येथे बागमती नदीने पुररेषा ओलांडली आहे. यामुळे दरभंगा जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पुराचा धोका निर्माण झाला. खगरिया जिल्ह्यात कोसी नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे.
बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील कमला नदीजवळील गावे पाण्याखाली गेली आहेत. येथील अनेक कुटुंबांना इतरत्र आश्रय घ्यावा लागला आहे. कोसी, महानंदा, गंडक या नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत.
दरभंगा जिल्ह्यातील पंचोभ पंचायतचे प्रमुख राजीव कुमार चौधरी यांनी १२ गावातील 50 हजार लोक पूरग्रस्त झाले आहेत, असे ईटिव्ही भारत सोबत बोलताना सांगितले आहे. ज्या प्रमाणात पाणी पातळी वाढत आहे, त्यानुसार लोकांच्या घरात काही तासातच पाणी घुसेल, असे त्यांनी सांगितले.
धर्मेंद्र कुमार या स्थानिक नागरिकाने पुराच्या पाण्यामुळे गावचा संपर्क तुटला आहे. प्रशासनाने लवकरात लवकर बोटीच्या सहाय्याने मदतकार्य सुरु, करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात मान्सून सक्रिय आहे. विविध जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि ढगफुटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पाटणा, जेहनाबाद,नावदा, भोजपूर,रोहतास, औरंगाबाद, सिवान, छपरा, बंका जिल्ह्यात वीज कोसळण्याच्या घटना वाढू शकतात, असा अंदाज व्यक्त केला आहे.