नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) आणि काँग्रेस यांचे महागठबंधन एकत्रित लढणार आहेत. मात्र, घटक पक्षांतील जागा वाटपाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. महागठबंधनमध्ये दुरावा नसल्याचे बिहार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मदन मोहन झा यांनी म्हटले आहे.
महागठबंधनमध्ये सर्व काही ठीक आहे. आमच्यात कोणताही दुरावा नसल्याचे झा म्हणाले. जागा वाटपावर निर्णय घेण्यासाठी झा नुकतेच दिल्लीला गेले होते. राज्यातील महत्त्वाच्या आणि जिंकून येण्याची शक्यता असलेल्या मतरासंघांची माहिती त्यांनी दिल्लीतील वरिष्ठांना दिली.सध्या जागा वाटपावरून घटक पक्षांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. मात्र, अद्यापही जागा वाटपावर तोडगा निघालेला नाही. जागा वाटपाचा निर्णय पुढील दोन दिवसांत घेण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. आरजेडीबरोबर काँग्रेसचा कोणताही वाद नाही. येत्या काही दिवसांत सर्व चित्र स्पष्ट होईल. तसेच पत्रकार परिषदेद्वारे जागा वाटपाची माहिती देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, बिहारमध्ये सध्या जनता दल (यू) आणि भाजपाच्या एनडीएचे सरकार आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वात एनडीए पुन्हा सत्ता काबिज करेल अशी रणनीती एनडीएकडून आखली जात आहे. या आघाडीला शह देण्याचे मोठे आव्हान महागठबंधनसमोर राहाणार आहे.