पाटणा : नितीश कुमार यांची विधिमंडळाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. एनडीएच्या विधिमंडळाची बैठक आज बोलावण्यात आली होती, त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. एनडीएमध्ये भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी नितीश कुमार यांची निवड होते की, नाही याबाबत अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले होते. मात्र, निवडणुकीपूर्वीच ठरल्याप्रमाणे नितीश कुमार यांचीच मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात येईल, असे भाजपाने स्पष्ट केले होते.
राजनाथ सिंह, फडणवीस उपस्थित..
एनडीएच्या विधिमंडळाच्या बैठकीला राजनाथ सिंह हे पर्यवेक्षक म्हणून उपस्थित आहेत. तसेच सिंहांसोबत, भाजपचे बिहार निवडणूक प्रभारी देवेंद्र फडवणीस आणि बिहार राज्य प्रभारी भूपेंद्र यादव हे दोघेही उपस्थित असणार आहेत.
उपमुख्यमंत्रीपदासाठी तीन नावे पुढे..
उपमुख्यमंत्रीपदासाठी भाजपमध्ये तिघांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. यामध्ये सध्याचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांच्याबरोबरच प्रेम कुमार आणि रा. स्व. संघाचे वरिष्ठ नेते कामेश्वर चौपाल यांचा समावेश आहे.
भाजपाचीही बैठक..
आज सकाळी भाजपाच्या आमदारांचीही बैठक पार पडली. यामध्ये भाजपाच्या गटनेत्याची निवड करण्यात आली. पाटणामधील भाजपा प्रदेश मुख्यालयात ही बैठक पार पडली.
भाजप नेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण..
या निवडणुकीत भाजपचे तब्बल ७४ आमदार निवडून आल्यामुळे पक्षातील नेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पहिल्यांदाच बिहारमध्ये भाजपला एवढ्या मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे.
हेही वाचा : जम्मू काश्मीर : जागा वाटपाच्या मुद्द्यावरून पीडीपी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याचा राजीनामा