पाटणा : बिहार विधानसभा निवडणूकीची धुरा सांभाळणारे देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी, केंद्रीय मंत्री नित्यानंद राय आणि इतर काही नेत्यांनी जनता दल (युनायटेड)च्या नेत्यांची भेट घेतली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपासंबंधी ही बैठक असल्याचे बोलले जात आहे.
भाजप आणि जदयू ही निवडणूक एकत्रित लढणार आहेत, मात्र त्यांनी अद्याप आपले जागावाटप जाहीर केले नाही.
फडणवीसांनी यापूर्वी दोन ऑक्टोबरला केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी एका बैठकीला हजेरी लावली होती. बिहार निवडणुकीसंदर्भात त्यांनी भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत चर्चा केली. त्यापूर्वी एक ऑक्टोबरला लोक जनशक्ती पक्षाचे (एलजेपी) प्रमुख चिराग पासावान यांनीही अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांची भेट घेत जागावाटपासंबंधी चर्चा केली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने एलजेपीला विधानसभेच्या २७ जागा आणि एमएलसीच्या २ जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, पासवान यांनी भाजपला ४३ जागांची मागणी केली आहे.
दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकांसाठी महागठबंधनमध्ये जागावाटप झाले असून राष्ट्रीय जनता दल 144, काँग्रेस 70 आणि डावे पक्ष 29 जागांवर लढणार आहेत. यावेळी सर्वच पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. याचबरोबर तेजस्वी यादव मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असणार असून यावर सर्व पक्षांनी सहमती दर्शवली आहे.
हेही वाचा : बिहार निवडणूक : महागठबंधनचा जागावाटपाचा तिढा सुटला; पाहा कुणाच्या पदरात किती जागा...