शेतकरी आंदोलनाचा ४४वा दिवस
कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलनाला बसले आहेत. त्यांच्या आंदोलनाचा आज ४४वा दिवस आहे. दिल्लीच्या सीमांवर प्रमुख ४० शेतकरी संघटनांसह, देशभरातील सुमारे ५०० शेतकरी संघटनांचे हजारो शेतकरी ठाण मांडून आहेत. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत आलेल्या थंडीच्या लाटेमध्येही हे शेतकरी सीमांवरतीच बसून आहेत. केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घ्यावेत, आणि एमएसपी लागू करावी या दोन प्रमुख मागण्यांसाठी ही आंदोलने सुरू आहेत.
लालुंची आज सुनावणी
बहुचर्चित चारा घोटाळ्याप्रकरणी दोषी असलेल्या लालू प्रसाद यादव यांची तुरूंगात हस्तक्षेप केल्याप्रकरणी झारखंड उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. या प्रकरणातील सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्ती अपरेश कुमार सिंग यांच्या कोर्टाने याप्रकरणाची पुढील सुनावणी आज ८ जानेवारीला ठेवली आहे. दरम्यान, झारखंड सरकारला पुन्हा उत्तर सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
ब्रिटन-भारत विमानसेवा आजपासून सुरू
भारत ब्रिटनमध्ये ६ जानेवारीपासून विमान सेवा पुन्हा सुरू झाली. आता आजपासून ब्रिटनहून भारतात येणारी विमाने दोन दिवस उशीरा म्हणजेच ८ जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक आठवड्यात ३० फ्लाईट सुरू राहणार आहेत. यातील १५ विमाने भारतीय कंपन्यांची तर १५ ब्रिटनचे असतील, असे नागरी उड्डाण मंत्र्यांनी ट्विटरवरून सांगितले. २३ जानेवारीपर्यंत हे वेळापत्रक राहणार असून त्यानंतर पुन्हा निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज चंद्रपूर दौऱ्यावर
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यादरम्यान ते नागभीड तालुक्यातील गोसेखुर्द प्रकल्पाच्या घोडाझरी कालव्याची पाहणी करणार आहेत. गोसेखुर्द प्रकल्पाचा लाभ हा चंद्रपूर जिल्ह्यातील मोठ्या भागाला होणार आहे. ब्रम्हपुरी, नागभीड, सावली या तालुक्यातील शेतकऱ्यांना याच्या सिंचनाचा लाभ मिळणार आहे. अनेक ठिकाणी कालव्याची कामे पूर्ण झाली आहेत. तर काही कामे प्रगतीपथावर आहेत. याची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नागभीड तालुक्यातील घोडाझरी येथे भेट देणार आहेत.
पुण्यात आज पाणी नाही
पुणे शहराच्या सर्व भागातील पाणीपुरवठा आज (शुक्रवार, दि. ८ जानेवारी, २०२१) देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे बंद राहणार असून शनिवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होऊ शकणार आहे.
११ वी प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या विशेष फेरीचा शेवटचा दिवस
११ वी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या विशेष फेरी अखेर ३,१४,५६९ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. दुसऱ्या विशेष फेरीचे प्रवेश सुरु असून आज ८ जानेवारी रोजी संपणार आहेत. त्यानंतर एफसीएफएस (FCFS) फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे.
बुलडाण्यात ड्राय रन
कोविड लसीकरणाच्या तयारीसाठी ८ जानेवारी रोजी बुलडाण्यात रंगीत तालीम होणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर्स, कर्मचारी यांना लस मिळणार आहे. जिल्हा सामान्य रूग्णालय बुलडाणा, ग्रामीण रूग्णालय दे. राजा, प्राथमिक आरोग्य केंद्र डोणगांव ता. मेहकर व सोनाळा ता. संग्रामपूर येथे ड्राय रन होईल.
औरंगाबादमध्ये होणार लसीकरणाचा सराव
राज्यात दुसऱ्या टप्प्यात कोरोना लस देण्याबाबत प्रात्यक्षिक केले जाणार आहे. आज शुक्रवारी सकाळी नऊ ते अकरा या काळात औरंगाबाद जिल्ह्यात सिडको ऐन 11, वाळूज येथील बजाजनगर भागात आणि वैजापूर अशा तीन ठिकाणी चाचणी केली जाणार आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ही माहिती दिली.
रॉकिंग स्टार यशचा वाढदिवस
केजीएफ फेम अभिनेता यशचा आज ३४वा वाढदिवस आहे. यशच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी 'केजीएफ २' चा टीझर प्रदर्शित झाला आहे. आज म्हणजे ८ जानेवारीला हा टीझर रिलीज होणार होता. मात्र, चाहत्यांच्या मागणीवरुन तो एक दिवस आधीच प्रदर्शित झाला आहे.
सिडनी कसोटीचा दुसरा दिवस
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्याची कसोटी मालिका खेळली जात आहे. यातील तिसरा सामना कालपासून सिडनी येथे होत आहे. पावसामुळे चार तासांचा खेळ वाया गेल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाअखेर ५५ षटकात २ बाद १६६ धावा केल्या आहेत. मार्नस लाबूशेन ६७ तर स्टिव्ह स्मिथ ३१ धावांवर नाबाद खेळत आहेत. आज या कसोटीचा दुसरा दिवस आहे.