लखनऊ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राम मंदिराच्या भूमीपूजनाला उपस्थित राहणाऱ्या लोकांची संख्या मर्यादित ठेवण्यात आली आहे. त्यामुळे, देशातील नागरिकांनाही या सोहळ्याचा आनंद घेता यावा यासाठी भूमीपूजनाच्या कार्यक्रमाचे दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. राम जन्मभूमीर तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी याबाबत माहिती दिली.
राय यांनी नागरिकांना अयोध्येमध्ये न येण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी आपल्या घरीच राहून हा सोहळा अनुभवावा, आणि घरीच आनंद साजरा करावा असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच, अयोध्येला येण्याऐवजी सायंकाळी जवळपासच्या मंदिरात जाऊन प्रार्थना कराव्यात असेही त्यांनी सुचवले आहे. स्वतंत्र भारतातील ही एक ऐतिहासिक घटना असेल, असेही ते पुढे म्हणाले.
पाच ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत अयोध्येतील राम मंदिराचे भूमीपूजन होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, एमएम जोशी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांनाही आमंत्रित केले गेले आहे.
हेही वाचा : राम मंदिर भूमीपूजन कार्यक्रमावर दहशतवादी हल्ल्याचे सावट; पाकिस्ताननं आखला कट...