दंतेवाडा (छत्तीसगढ) - पावसाळा सुरू असला तरी बस्तर आणि दंतेवाडा परिसरात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. पाऊस पडावा यासाठी इंद्र देवाकडे उदेला गावात 84 गावचे पुजारी प्रार्थना, पूजा-अर्चा करत आहेत.
येथील पूजेची अनोखी परंपरा आहे. पाऊस काळ कमी असल्यास डोंगरातील भीमसेन नावाचा देव विराजमान असलेला दगड पूजा करून हलवला जातो. लोकांचे म्हणणे आहे की, हा देवाचा दगड हलवल्यानंतर परिसरात चांगला पाऊस होतो. या दगडाची उंची जवळपास 4 फूट आहे. शेकडो ग्रामस्थ पाऊस पडावा, यासाठी येथे प्रार्थना करून दगड हलवतात.
मंगळवारी पूजा विधी करून हा दगड हलवण्यात आला. ग्रामस्थांना आता पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. यावेळी कुआकोंडाची प्रमुख देवी गंगादेई, लछनदेई, कोंडराज बाबा यांच्यासोबत 84 गावचे पुजारी उपस्थित होते. पूजा करून सर्वांनी चांगल्या पावसासाठी प्रार्थना केली.