हैदराबाद - भारत बायोटेकने शनिवारी आपल्या कोरोनाव्हायरस लस 'को-वॅक्सिन'च्या क्लिनिकल ट्रायल (क्लिनिकल ट्रायल)साठी २३ हजार स्वयंसेवकांच्या भरतीची घोषणा केली आहे. देशातील विविध ठिकाणी क्लिनिकल ट्रायलसाठी भारत बायोटेक जवळपास २६ हजार जणांना सहभागी करून घेण्याच्या प्रयत्नात आहे. त्यादिशेने पावले टाकण्यास सुरुवात झाली आहे.
सर्वात महत्त्वाचा टप्पा
कोव्हॅक्सिनच्या तिसर्या टप्प्यातील मानवी क्लिनिकल ट्रायल नोव्हेंबरच्या मध्यापासून 26 हजार स्वयंसेवकांच्या उद्दिष्टाने सुरू झाल्या. हैदराबादस्थित कंपनीने म्हटले आहे, की कोविड १९च्या अभ्यासाकरिता हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. त्यातही तिसरा टप्पा सर्वात महत्त्वाचा असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
'देश व जगासाठी मनोबल वाढवणारा'
भारत बायोटेकच्या सहव्यवस्थापकीय संचालक सुचित्रा एला म्हणाल्या, "या चाचणीत भाग घेण्यासाठी आपला वेळ देणाऱ्या प्रत्येक स्वयंसेवकाचे आम्ही आभार मानतो. त्यांचा सहभाग देश व जगासाठी मनोबल वाढवणारा आहे. आम्ही सर्व डॉक्टर्स, कर्मचारी आणि रुग्णालय प्रशासनाचे आभार मानतो."
'२६ हजार जणांना करणार सहभागी'
त्या म्हणाल्या, “कोवॅक्सिनच्या तिसर्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलसाठी २६ हजार जणांना सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
आपत्कालीन वापरासाठी मंजुरी
उल्लेखनीय बाब म्हणजे, केंद्रीय औषधनिर्माण मानक नियंत्रण संघटना (सीडीएससीओ)च्या विषय तज्ज्ञ समितीने शनिवारी आपत्कालीन वापरासाठी भारत बायोटेकची कोरोना लस 'कोवॅक्सिन'ला मंजुरी दिली आहे. दरम्यान, 'कोवॅक्सिन'च्या मंजुरीबाबत अंतिम निर्णय ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया(डीसीजीआय)ने अद्याप घेतलेला नाही.