दिल्ली - शनिवारची मध्यरात्री भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात मध्यरात्रीच्या सुमारास शिशु केअर युनिटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या अग्नितांडवात दहा बालकांचा मृत्यू झाला. या घटनेवर केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इरानी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही घटना अत्यंत दुर्देवी असून अतिशय वेदनादायी आणि मनाला व्यथित करणारी आहे. या सर्व कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे त्या म्हणाल्या. तसेच राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने या घटनेबाबत अहवाल मागितला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
रूग्णालयात मोठ्या प्रमाणात होते रूग्ण -
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये (SNCU) आग लागल्यामुळे दहा नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शनिवारी मध्यरात्री जवळपास दोन वाजता ही आग लागली. SNCU मध्ये एकूण 17 नवजात बालके होती. त्या पैकी 7 बालकांना वाचविण्यात यश आले आहे. आग लागली तेव्हा रूग्णालयात अन्य रूग्ण ही मोठ्या प्रमाणात होते. त्यांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याचे ही जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितले. आग नक्की कशामुळे लागली या बाबत चौकशी केली जाईल असेही ते म्हणाले.
हेही वाचा - प्रथमदर्शनीत भंडारा जिल्हा रुग्णालयाची आग शॉर्ट-सर्किटमुळे - आरोग्य राज्यमंत्री