मुंबई - बंगाली अभिनेते आणि तृणमूल काँग्रेसचे माजी खासदार तपस पॉल यांचे मुंबईत हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या नातेवाईकांनी याबाबत माहिती दिली. ते ६१ वर्षांचे होते.
पॉल हे त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी मुंबईला आले होते. कोलकात्याला परत जात असताना मुंबईच्या विमानतळावरच अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे त्यांना तत्काळ जूहू येथे रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. ते हृदयविकाराने त्रस्त होते. गेल्या दोन वर्षात अनेकदा त्यांनी उपचार घेतले होते.
बंगालच्या कृष्णानगरमधून ते दोन वेळा खासदार तर अलिपोरीमधून ते एकदा आमदार म्हणून निवडून आले होते. साहेब (1981), परबत प्रिया (1984), भलोबासा भलोबासा (1985), अनुरागर चोयान (1986), अमर बंधन (1986) हे त्यांचे काही गाजलेल चित्रपट होते.
त्यांना साहेब चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. डिसेंबर २०१६ मध्ये रोझ व्हॅली चिटफंड घोटाळ्यात सीबीआयने त्यांना अटक केल्यानंतर ते चित्रपटांपासून दूर राहिले होते. त्यांना एका महिन्यांनंतर जामीन मिळाला होता.