मुंबई - टीआरपी घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनी आणि ब्रॅाडकास्ट ऑ़डियन्स रिसर्च कौन्सिल (बार्क) यांच्यात ई-मेलवरून वाद रंगला आहे. बार्कने पाठवलेला एका ई-मेल संबधित वृत्तवाहिनीने उघड केला आहे. या ई-मेलचा हवाला देत बनावट टीआरपी घोटाळ्यात बार्कने क्लीनचिट दिल्याचा दावा या वृत्तवाहिनीने केला आहे. मात्र हा ई-मेल सार्वजनिक केल्याबद्दल बार्कने नाराजी व्यक्त केली आहे. हा ई-मेल जाहीर करणे हे अतिशय निराशाजनक असून तो चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आला आहे, असे बार्कने म्हटले आहे.
संबधित वृत्तवाहिनीनेच्या सीईओने १६ ऑक्टोबर रोजी बार्कचे सीईओ सुनील लुल्ला यांना ई-मेल करून कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाले नसल्याचे म्हटले आहे. तर, १७ ऑक्टोबर रोजी याच्या उत्तरादाखल बार्कने ई-मेल पाठवला आणि बार्कच्या अंतर्गत यंत्रणेवर विश्वास दाखवल्याबद्दल आभार मानले आहेत. या वृत्तवाहिनी विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई झाली असती तर, बार्क इंडिया तुमच्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे उपलब्ध करू शकले असते, असेही त्यात म्हटले आहे.
हाच पत्रव्यवहार संबंधित वृत्तवाहिनीने उघड केल्याबद्दल बार्कने नाराजी व्यक्त केली आहे. रेटिंगच्या हेरफेरच्या कथित आरोपांबाबत सध्या सुरू असलेल्या तपासणीबाबत आम्ही भाष्य केले नसून यासंदर्भातील तपासणीबाबत आम्ही कोणताही जबाब दिला नाही, असे बार्कने म्हटलं आहे.
बार्कच्या या भूमिकेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी पीटीआयला सांगितले की, बार्कच्या ईमेलमध्ये दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त परमबीर सिंग खोटे बोलले असून यांनी त्वरित राजीनामा द्यावा, असे गोस्वामी म्हणाले.
पोलिसांकडून चलचित्र वाहिन्यांच्या (टीव्ही चॅनल्स) टीआरपी घोटाळ्याचा एक मोठा खुलासा करण्यात आलेला आहे. आपल्या चॅनेलचा टीआरपी जास्त यावा यासाठी काही चॅनल्स संबंधितांना पैसे देऊन दिवसभर टीव्ही सुरू ठेवत ते चॅनल लावण्यास सांगत होते. हे रॅकेट देशासह विदेशातही अस्तित्वात असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिली. काही दिवसापूर्वी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषदेत याबाबतीत खुलासा केला होता.