वाराणसी - कोरोनाचा देशात धुमाकूळ सुरू आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, प्रशासन आणि आरोग्य विभाग युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. पोलीस प्रशासन या सर्वांना खंबीर साथ देत आहेत. मात्र, लॉकडाऊनच्या काळात दिवस-रात्र काम करत असलेल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांचे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. यावर बनारसमध्ये अनोखा उपाय शोधण्यात आला आहे.
योगासने आणि मेडीटेशन करुन पोलिसांचा मानसिक तणाव कमी करण्याचा प्रयत्न बनारसमध्ये होत आहे. कोरोना लॉकडाऊन काळातील संचारबंदीमुळे अनेक पोलीस कर्मचारी जास्त वेळ काम करत आहेत. काहीजण अनेक दिवसांपासून घरीही गेलेले नाहीत. या कारणांमुळे पोलीस कर्मचाऱयांचे शारीरीक आणि मानसिक आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. बनारस पोलिसांनी यावर उपाय काढत योगा करण्याचा निर्णय घेतला.
केंट रेल्वे स्टेशन परिसरात दररोज सकाळी अनेक पोलीस कर्मचारी आणि जीआरपी जवान एकत्र येऊन योगा करत आहेत. या दरम्यान आवश्यक ते सोशल डिस्टन्सिंगही ठेवले जाते.