मुंबई - कोरोना विषाणूचा प्रसार काही ठिकाणी कमी-जास्त होत असला तरी त्याची भीती अद्याप गेलेली नाही. कोरोनावर जालीम औषध मिळत नाही तोपर्यंत तोंडावर मास्क लावावा लागणार आहे. मास्क ही सध्या नित्याची बाब झाली असून त्याला अनेकजण कंटाळले आहेत. अशातच नवजात बाळाने डॉक्टरांच्या तोंडावरचा मास्क ओढल्याचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
युएईमधील गायनॅकोलॉजिस्ट असणाऱ्या डॉ. सामीर चेईब यांनी शेअर केलेला एका नवजात बाळाचा फोटो सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. जन्माला आल्यानंतर लगेचच हे बाळ डॉक्टरांच्या तोंडावरील सर्जिकल मास्क ओढताना दिसत आहे. बाळाच्या या कृतीवर डॉक्टर हसताना दिसत आहेत.
हेही वाचा - लग्न कधी करणार? चाहत्याच्या प्रश्नावर सुष्मिता सेन म्हणाली...
लवकरच मास्क काढून टाकणार आहोत, हे दाखवणारे हे प्रतिकच आहे, असे कॅप्शन फोटोखाली डॉक्टरांनी दिले आहे. आपल्या सर्वांच्या तोंडावरील मास्क लवकरच निघेल, असा हा शुभसंकेत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. हा फोटो युएईमधील गायनॅकोलॉजिस्ट असणाऱ्या डॉ. सामीर चेईब यांनी आपल्या सोशल मीडियावरून शेअर केला आहे. बाळाला गर्भशयामधून बाहेर काढल्यानंतर त्याने डॉक्टरांचा मास्क पकडला आणि ते ओढू लागले. यामुळे डॉक्टरांनाही हसू आवरता आले नाही.