पणजी- काँग्रेसमधून फुटून भाजपमध्ये आलेले तत्कालीन विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांना उपमुख्यमंत्री, कृषी, पुरातत्व, आर्कालॉजी आणि कारखाने आणि बाष्पक आदी मंत्रीपदांचा पदभार सोपविण्यात आला आहे. तर मायकल लोबो यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे कचरा व्यवस्थापन, विज्ञान आणि तंत्रज्ञान, बंदर आणि ग्रामीण विकास आदी खात्यांचा पदभार सोपविण्यात आला आहे.
काँग्रेसच्या 10 आमदारांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर शनिवारी त्यामधील तिघांना आणि माजी उपसभापती मायकल लोबो यांना पद आणि गोपनियतेची शपथ देण्यात आली होती. तर आज मुख्यमंत्र्यांनी सदर मंत्र्यांना खाते वाटप केले आहे.
यामध्ये जेनिफर मोन्सेरात यांना महसूल, माहिती आणि तंत्रज्ञान आणि कामगार मंत्रालय देण्यात आले आहे. तर फिलीप नेरी रॉड्रिग्ज यांच्या कडे जलस्रोत, मच्छीमारी आणि वजनमाप खात्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
आज सकाळी विधानसभा पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ होण्यापूर्वी लोबो यांनी आपल्याकडे कचरा व्यवस्थापन मंत्रालयाची जबाबदारी दिली जावी. ज्यामुळे राज्यातील कचरा साफ करणे सोपे होईल, अशी इच्छा व्यक्त केली होती.