लखनऊ - बाबरी मशीद विध्वंसप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या(सीबीआय) विशेष न्यायालयाने ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांचा जबाब नोंदविला. 92 वर्षीय अडवाणी यांच्या जबाब विशेष न्यायाधीश ए. के. यादव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोंदवून घेतला. गुरुवारी भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांचा जबाबही न्यायालयाने नोंदविला.
बाबरी मशीद विध्वंसप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या 313 कलमानुसार 32 आरोपींचे जबाब नोंंदविण्यास सुरुवात केली आहे. यावेळी आरोपींना त्यांच्यावरील आरोपांचे खंडन करण्याचीही संधी मिळते. 6 डिसेेंबर 1992 ला अयोध्येतील बाबरी मशीद कारसेवकांकडून पाडण्यात आली होती. त्यावेळी लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी राम मंदिर अभियानाचे प्रमुख नेते होते.
सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार खटला 31 ऑगस्टपर्यंत संपविण्यासाठी सीबीआयचे विशेष न्यायालय दररोज सुनावणी घेत आहे. भाजप नेत्या आणि मध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती या मागील महिन्यात सीबीआय न्यायालयात जबाब नोंदविण्यासाठी हजर झाल्या होत्या. तत्कालीन केंद्रात सत्तेत असलेल्या काँग्रेस सरकारने राजकीय सुड उगवण्यासाठी माझ्यावर आरोप लावण्यात आले, असे उमा भारती यांनी जबाब नोंदविताना म्हणाल्या. तर भाजप नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी त्यांच्यावरील आरोप निराधार आणि खोटे असल्याचे जबाबात म्हटले.