नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोनाने थैमान घातले असून भारतामध्येही कोरोनाचा प्रसार वाढत चालला आहे. कोरोना विषाणूवर जगभरातील संशोधक लस शोधत आहेत. कोरोनाविरोधातील या लढाईत आयुर्वेदाच्या माध्यमातून बाबा रामदेवही आपले योगदान देत आहेत. बाबा रामदेव यांनी आयुर्वेदासंबधी खास चर्चा ईटीव्ही भारतशी केली. तसेच या संकटात प्रत्येक बातमी लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी कार्यरत असलेल्या ईटीव्ही भारतचे कौतुक केले.
कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी योगगुरु रामदेव बाबा यांनी स्वदेशी रामबाण उपाय सांगितले आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी आपल्याला शरिरातील प्रतिरोधक शक्ती वाढवावी लागेल. त्यासाठी आपण योग आणि आयुर्वेद स्वीकारले पाहिजे. योग आणि आयुर्वेदाद्वारे आपण कोरोनाचा सामना करू शकतो, असे ते म्हणाले.
यापूर्वी बाबा रामदेव यांनी पतंजली योगपीठाकडून योगदान देत पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी २५ कोटींचा निधी देण्याची घोषणा केली होती. पतंजली योगपीठ आणि अन्य प्रकल्पातील कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतनही पीएम सहाय्यता निधीसाठी दिले जाईल, असे ते म्हणाले होते.
दरम्यान कोरोना साथीचा आजार असल्याने एकमेकांच्या संपर्कात आल्याने पसरू शकतो. नाक, तोंडाला हात लावणेही टाळावे. कारण अस्वच्छ हाताद्वारे कोरोनाचा विषाणू शरिरात प्रवेश करु शकतो. याबरोबरच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आहावन प्रत्येक देशाकडून करण्यात येत आहे. याबाबत आरोग्य विभागांनी नियमावली जारी केली आहे.