मेलबर्न : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्याशी व्हर्च्युअल चर्चा केली. या चर्चेनंतर त्यांनी पंतप्रधान मोदींना पुढच्या भेटीपूर्वी आपण गुजराती खिचडी बनवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान व्हर्च्युअल परिषद झाली. यामध्ये गंभीर विषयांवर बोलणी झाल्यानंतर, दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी काही मोकळ्या गप्पा मारल्या.
आम्ही सध्या व्हच्युअली भेटत आहोत. कदाचित पुढच्या वेळी मोदींचा होलोग्राम इथे माझ्या कार्यालयात असू शकतो, असे मॉरिसन म्हणाले. यावेळी त्यांनी, मोदींनी २०१४च्या लोकसभेपूर्वी केलेल्या 'होलोग्राम' कॅम्पेनचा उल्लेख केला.
यावेळी बोलताना मॉरिसन म्हणाले, की 'समोसा' या पदार्थाची ओळख करून दिल्याबाबत धन्यवाद. त्यांनी मागच्या आठवड्यात समोसा बनवून त्याबाबत ट्विट केले होते. तसेच "मी आज भारतात असतो, तर मोदींची प्रसिद्ध 'मिठी' मला अनुभवता आली असती, आणि मी बनवलेले समोसेही त्यांना देता आले असते" असेही मॉरिसन म्हणाले.
तर यावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, की तुमच्या समोशांची चर्चा देशभरात सुरू आहे. तसेच गुजराती खिचडीचा उल्लेख तुम्ही केल्यामुळे राज्यातील लोक नक्कीच आनंदी झाले असतील. ऑस्ट्रेलियामध्ये मोठ्या प्रमाणात गुजराती लोक आहेत. तसेच, खिचडी ही संपूर्ण भारतात वेगवेगळ्या नावांनी प्रसिद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा : आंध्र प्रदेश सरकारकडून 2 लाख 62 हजार टॅक्सी आणि रिक्षा चालकांना प्रत्येकी 10 हजारांची मदत