औरंगाबाद - नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात शहर देशात अग्रस्थानी आला आहे. शहरात आतापर्यंत 89 हजार 82 नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या असून लवकरच एक लाख तपासण्या पूर्ण होतील,असा दावा मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी केला आहे.
प्रशासनाच्या त्रिसूत्री कार्यक्रम अंतर्गत शहरात मोठ्या प्रमाणात तपासणी सुरू करण्यात आली आहेत. 2011 च्या जनगणनेनुसार, शहराची लोकसंख्या 12 लाख आहे. त्यामानाने एक लाख लोकसंख्येमागे 7423 तपासण्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तपासणी करण्यात औरंगाबादने दिल्ली आणि गोव्याला मागे टाकून देशात अव्वालस्थान मिळवले आहे. लक्षण असलेल्या रुग्णांची तपासणी करून उपचार करण्याबरोबर लक्षण नसलेल्या रुग्णांचा तपास करण्यावर मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी भर दिला आहे. शहरातील रुग्ण शोधून काढण्यासाठी 'एमएच एमएच' नावाचे हे अॅप्लिकेशन तयार केले. या माध्यमातून मनपाच्या वॉर रूममधून शहरातील अनेक लोकांवर लक्ष ठेवण्याचे काम करण्यात आले. त्यानंतर प्रत्येक घरात जाऊन ऑक्सिमीटर आणि थर्मल गनच्या माध्यमातून जेष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करून घेण्यात आली. त्यानंतर अँटीजन टेस्टच्या माध्यमातून शहरातील विविध भागांमध्ये नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या.
हेही वाचा - मुंबईच्या धर्तीवर काॅल सेंटर सुरू करा; शरद पवारांच्या नाशिक प्रशासनाला सूचना
शहरात जुलै महिन्यात नऊ दिवसांच्या लॉकडाऊन नंतर जवळपास 20 हजार व्यापाऱ्यांच्या अँटीजन टेस्ट करून घेत जवळपास 500 बाधित व्यापाऱ्यांचा शोध घेण्यात आला. अशा प्रकारे अनेक उपाययोजना करत लक्षण असलेले आणि लक्षण नसलेले रुग्ण शोधण्याचे काम करण्यात आले. त्यामुळे रुग्णसंख्या वाढलेली जरी दिसत असली तरी त्यामानाने तपासणीचे प्रमाण सर्वाधिक आहे. तसेच, उपचार घेऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर वाढविण्यात तर मृत्युदर कमी करण्यात यश आल्याची माहितीही आयुक्तांनी दिली. लक्षण नसलेले रुग्ण वेळेत आढळून आल्याने त्यांच्यापासून बाधित होणाऱ्या नागरिकांचा बचाव करणे शक्य झाले असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. दरम्यान, ऑगस्ट महिन्यात बकरी ईद असून खाटीक समाजातील जे लोक बळी देण्याचा विधी करणार आहेत. त्यांनी आधी आपल्या घराजवळच्या मनपा केंद्रात जाऊन अँटीजन तपासणी करून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. यासंदर्भात मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी ईटिव्ही भारतशी संवाद साधला आहे.