जयपूर - लॉकडाऊन काळात सर्वत्र संचारबंदी लावण्यात आली आहे. पोलीस नागरिकांनी घराबाहेर पडू नये याची काळजी घेत आहेत. मात्र, काही नागरिक उलट पोलिसांवर हल्ले करत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. राजस्थानमधील टोंक जिल्ह्यातील पाचबत्ती परिसरात पोलीस कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
पोलिसांवर हल्ला झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणात फौजफाटा पाठवण्यात आला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्तांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी काही नागरिकांना अटक करण्यात आली आहे. टोंकमध्ये या अगोदरही आरोग्य विभागाच्या आरोग्य सेविकांवर हल्ला झाला होता.