नवी दिल्ली - केजरीवाल सरकारचे उत्पादन आणि शुल्क विभाग आता दारूच्या दुकानांवर लक्ष ठेवणार आहे. आप सरकारने दिल्लीमध्ये जागोजागी बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने हे केले जाणार आहे. दिल्लीमध्ये होणाऱ्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला आहे.
उत्पादन शुल्क विभागाने या कामासाठी ११ विशेष अधिकारी नियुक्त केले आहेत. हे अधिकारी याआधीच्या साठ दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज हे सांभाळून ठेवतील, आणि ते तपासतील. तसेच यापुढेही ते विशेषतः दारूच्या दुकानांबाहेरील कॅमेऱ्यांचा वापर करून या दुकानांवर लक्ष ठेवणार आहेत. निवडणुकीआधी मतदारांना दारूचे आमिष दाखवण्याचा प्रकार होऊ नये यासाठी दिल्ली सरकारने हे पाऊल उचलले आहे.
या अधिकाऱ्यांना दररोज आपला अहवाल सादर करावा लागणार आहे. या अहवालात संबंधित सीसीटीव्ही कॅमेरा सुरू होता की नव्हता, तसेच संबंधित दारूच्या दुकानामध्ये किंवा गोदामामध्ये काही आक्षेपार्ह झाले की नाही याबाबत माहिती द्यावी लागणार आहे. एका अधिकाऱ्याने त्याला दिलेल्या प्रत्येक दुकान आणि गोदामाचे कमीतकमी १५ मिनिटांचे सीसीटीव्ही फुटेज पाहणे बंधनकारक आहे. तसेच, सर्व दारूच्या दुकानांचे २४ तास रेकॉर्डिंग करणे बंधनकारक करण्यात आले आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
आठ फेब्रुवारीला दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडेल, तर ११ फेब्रुवारीला निकाल जाहीर होईल.
हेही वाचा : 'सीएए विरोधी आंदोलकांना आम्ही कुत्र्यासारखे मारले' म्हणणाऱ्या भाजप नेत्याविरोधात तक्रार दाखल..