इडुक्की- ५ वर्षीय मुलाला त्याच्या काकाने जबर मारहाण केल्याची घटना जिल्ह्यातील थोडूपुझा उंदाप्लाऊ येथे शुक्रवारी घडली. इमदाद उल हक, असे आरोपीचे नाव असून त्यास पोलिसांनी काल ताब्यात घेतले.
या मारहाणीच्या घटनेत मुलाच्या डोक्यात गंभीर जखमा झाल्या आहेत. रुग्णालयात मुलाची तपासणी केली असता त्याच्या डोक्याला फ्रक्चर असल्याचे दिसून आले, तसेच अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याचेही समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी इमाद हा शुक्रवारी मुलाच्या घरी गेला होता. त्याने मुलाला बाहेर यायला सांगितले. मात्र, मुलाने बाहेर येण्यास नकार दिल्यानंतर आरोपी त्याच्या घरात शिरला व त्याने मुलाचे डोके जमिनीवर आपटले. त्यानंतर रात्री मुलाला अस्वस्थ वाटू लागले व त्याला उलट्या झाल्या. यानंतर त्याला थोडूपुझा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतरच मुलासोबत घडलेला प्रसंगाला वाचा फुटली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी इमदाद यास अटक केली.
इमदाद याने या अगोदर देखील मुलाला मारहाण केल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यानंतर आशा कर्मचाऱ्यांनी अशा घटनांना लगाम लावण्याची तंबी मुलाच्या कुटुंबाला दिली होती. दरम्यान, पीडित मुलाची प्रकृती ही धोक्या बाहेर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
हेही वाचा- मंत्री आणि प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करणारा डॉक्टर निलंबित