गुवाहाटी - आसाममध्ये पुराचा हाहाकार सुरू आहे. ब्रह्मपुत्रासह राज्यातील इतर नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. राज्यातील बराक नदीतील पाण्याच्या पातळीतही वाढ झाली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. आणखी पाऊस पडल्यास या भागात पूरसदृष्य परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा केंद्रीय जलसंपदा विभागातील कर्मचाऱयांनी दिला आहे. आसाम मध्ये सध्या सर्वत्र पुराच्या पाण्याचा वेढा दिसून येत आहे. आसाममधील नागरिकांना दरवर्षी अतिवृष्टीमुळे महापुराचा सामना करावा लागतो.
मिझोरम व इतर ठिकाणाहून पाणी बराक नदीत प्रवेश करते. नदीत जास्त पाणी शिरले तर परिस्थिती गंभीर होऊ शकते. अन्नपूर्णा घाटावरील पाण्याची पातळी दोन-तीन दिवसांपूर्वी धोक्याच्या पातळीपेक्षा सुमारे 30 सेंटीमीटरने वाढली होती. मात्र, त्यात घट झाली असून सध्या पाणी धोक्याच्या पातळीपासून खाली आहे. नदीतील पाण्याची पातळी वाढल्यास उद्भवणार्या कोणत्याही आव्हानांसाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत, असे राज्याचे जलसंपदा विभागातील कर्मचारी डेबोराटो रॉय यांनी सांगितले.
आसाममध्ये आलेल्या भीषण पुरामुळे आतापर्यंत 84 लोकांचा बळी गेला आहे, अशी माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एएसडीएमए) रविवारी दिली. मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा केला. सोनोवाल यांनी पूरग्रस्तांशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतला.
पुरामुळे 25 लाख 29 हजार 312 लोकांसह 1,12,138.99 हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. युनेस्कोने जागतिक संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या आसामच्या काझिरंगा राष्ट्रीय अभयारण्यालाही पुराचा जोरदार फटका बसला आहे. तब्बल 108 प्राण्यांचा मृत्यू झाला आहे.