गुवाहाटी(आसाम) - आसामच्या पूर परिस्थितीत किंचीत सुधारणा झाली आहे. मात्र राज्यातील १.९६ लाख लोकांना महापूराचा फटका बसलाय. तसेच १५ जिल्हे यामुळे प्रभावित झाले आहेत. ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्या जिया भारली, कोपिली या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. सरकारने आतापर्यंत २६ रिलिफ कॅम्पची सोय केली असून त्यामध्ये ४ हजार १२९ लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.
पाणी ओसरत असल्याने आसाम राज्यातील पूरपरिस्थितीत सुधारणा झाली असून १५ जिल्हे यामुळे प्रभावित झाल्याची माहिती एका अधिकृत वाहिनीने दिली आहे.
आसामचे राज्यपाल जगदीश मुखी यांनी राज्यातील पूर आणि जमीन धूप प्राधिकरण योजनांचा आढावा घेतला. सोमवारपासून बारपेटा आणि दक्षिण सलमारा जिल्ह्यात पूर पाणी ओसरण्याचे संकेत आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एएसडीएमए) दिले आहेत. तसेच पुरामुळे बाधित झालेल्या लोकांची संख्या 1.93 लाखांनी घटल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापनाने दिली आहे.
रविवारी घेण्यात आलेल्या माहितीनुसार, १९ जिल्हे पाण्याखाली होते. तसेच ८.५४ लाख लोक या पुरामुळे प्रभावित झाले आहेत. यावर्षी पूर आणि भूस्खलनांनी आतापर्यंत राज्यभरात 136 जणांचा बळी घेतला आहे. 110 लोक पूर-संबंधित घटनांमध्ये मरण पावले, तर दरड कोसळल्यामुळे 26 जण ठार झाले.
गोलपरा हा सर्वाधिक नुकसानग्रस्त जिल्हा असून सुमारे १.०५ लाख लोक प्रभावित झाले आहेत. त्यानंतर मोरीगावमध्ये २८ हजार १२६ आणि बक्सा १५ हजार लोक प्रभावित असल्याचे एएसडीएमएने म्हटले आहे.
संबंधित सरकारी बुलेटीननुसार, ३२५ गावं आणि २३ हजार ५९२ हेक्टर शेतजमीन अद्याप पाण्याखाली आहे. सरकार
सर्व जिल्ह्यांमध्ये 26 मदत शिबिरं आणि वितरण केंद्रे चालवत आहे. या ठिकाणी सध्या ४ हजार १२९ लोक वास्तव्यास आहेत.