न्यूयॉर्क - संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (यूएनएससी) भारताच्या कुटनितीचा विजय झाला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात दोन वर्षे मुदतीच्या अस्थायी सदस्यत्वासाठी भारताच्या उमेदवारीस चीन व पाकिस्तान यांचा समावेश असलेल्या एशिया-पॅसिफिक गटाने पाठिंबा दिला आहे. याची माहिती भारतीय राजदूत सय्यद अकबरूद्दीन यांनी दिली आहे.
पंधरा सदस्यीय सुरक्षा मंडळातील पाच अस्थायी सदस्यपदांसाठी पुढील वर्षी जूनमध्ये निवडणूक होणार आहे. यात निवड झालेल्या अस्थायी सदस्यांना २०२१ व २०२२ अशी दोन वर्षे काम करता येणार आहे.
एशिया-पॅसिफिक गटातील देशांनी भारताच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. सुरक्षा मंडळाचे अस्थायी सदस्यत्व २०२१ व २०२२ अशा दोन वर्षांसाठी आहे. सर्व ५५ सदस्यांचे त्यांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी भारताच्या वतीने आपण आभार मानतो, अशी संयुक्त राष्ट्रातील भारताचे राजदूत सय्यद अकबरूद्दीन यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
बेल्जियम, कोटव्हॉयर, डॉमनिक प्रजासत्ताक, विषुवृत्तीय गिनी, जर्मनी, इंडोनेशिया, कुवेत, पेरू, पोलंड, दक्षिण आफ्रिका हे सध्याचे दहा अस्थायी सदस्य आहेत