नवी दिल्ली - नेपाळ-भारत सीमेवर सध्या तणावग्रस्त स्थिती आहे. या परिस्थितीत भारतीय सैन्यदलाचे प्रमुख जनरल एम. एम. नरवणे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये नेपाळचा दौरा करणार आहेत. नेपाळने जारी केलेल्या वादग्रस्त नकाशानंतर भारताच्या उच्च नेत्याचा नेपाळचा दौरा करण्याची ही पहिली वेळ असणार आहे.
नेपाळच्या राष्ट्रपती बिद्या देवी भंडारी या एम.एम. नरवणे यांना नेपाळी लष्करातील मानद जनरल श्रेणी बहाल करणार आहे. ही परंपरा 1950 मध्ये सुरू झाली होती. तर या दौऱ्यात जनरल एम.एम. नरवणे नेपाळी समकक्ष जनरल पूर्ण चंद्र थापा यांच्यासह नेपाळी संरक्षण मंत्री इश्वर पोखरेल यांच्याशी चर्चा करणार आहेत. दोन्ही देशादरम्यान शांतता प्रस्थापित करण्यावर या बैठकीत चर्चा होईल.
भारत-नेपाळ वाद -
नेपाळने नवा नकाशा जाहीर केल्यापासून भारत आणि नेपाळचे संबंध ताणले गेले आहेत. नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या अध्यक्षतेत झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत नेपाळने नव्या नकाशाला मंजूरी दिली. या नव्या नकाशानुसार, लिपुलेख, कालापानी, लिंपियाधुरा आदी भाग हे नेपाळमध्ये दाखवण्यात आले आहेत. हे भाग भारताकडे आहेत. लिपुलेख या भागात भारत, नेपाळ आणि चीनची सीमा एकत्र येते. त्यामुळे या भागाला विशेष महत्त्व आहे.
नेपाळने आजवर या भूभागावर दावा केला असला तरी भारताने त्याला विरोध केला आहे. कैलास मानसरोवरला जाणाऱ्या रस्त्यावरही नुकतेच नेपाळने दावा केला आहे. या 80 किमी रस्त्याचे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी उद्घाटन केले होते.