नवी दिल्ली - दिल्ली पोलिसांनी मध्यवर्ती भागातील रिज रस्ता परिसरातून सुधारित स्फोटक यंत्रांसह (आयईडी) आयसीसच्या एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. शुक्रवारी रात्री चकमकीनंतर दहशतवाद्याला अटक करण्यात आली.
“धौला कुआन आणि करोल बाग दरम्यान रिज रस्त्यावरील गोळीबारानंतर दहशतवाद्याला अटक करण्यात आली”, असे पोलीस उपायुक्त (स्पेशल सेल) प्रमोदसिंग कुशवाह यांनी सांगितले आहे.
या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर, विशेष पथकाने धौला कुआन येथे आयसीसच्या दहशतवाद्याला अटक करण्यासाठी सापळा रचला. पोलिसांनी या दहशतवाद्याला आत्मसमर्पण करण्यास सांगितले. मात्र, त्याने नकार देत गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला आणि दहशतवाद्याला पकडले.
दहशतवाद्याला लोधी कॉलनीतील विशेष कार्यालयात आणण्यात आले आहे.