पणजी - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. गर्दी होणारी सगळी सार्वजनिक ठिकाणे ३१ मार्चपर्यंत बंद ठेवावीत, असे निर्देश सरकारने दिले आहेत. त्यानुसार वनविभागाने आजपासून राज्यातील अभयारण्ये आणि प्राणीसंग्रहालये पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
गोव्याचे सहाय्यक मुख्य वनसंरक्षक यांनी जारी केलेल्या निर्देशानुसार, सरकारने १४ मार्चला प्रतिबंधात्मक उपाययोजना घोषित केल्या होत्या. त्यानुसार वन्यजीव संरक्षण कायदा ९१७२ नुसार अभयारण्ये आणि प्राणीसंग्रहालयात ३१ मार्च आणि पुढील आदेश मिळेपर्यंत पर्यटकांसाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे.
१७ मार्चपासून मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या कामकाजाच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. मंगळवारपासून दुपारी १२ ते २ या वेळेत न्यायालयाचे कामकाज होणार आहे. तर रजिस्ट्री कामकाज सकाळी साडेअकरा ते दुपारी साडेतीन यावेळेत सुरू राहणार आहे. त्याबरोबरच कामाचे स्वरूप आणि निकड यानुसार न्यायाधीशांचेही वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.
आरोग्यमंत्र्यांची अधिकाऱ्यांशी बैठक
गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आज गोव्याच्या आरोग्य सचिव नीला मोहनन, गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर आणि अन्य अधिकारी यांची बैठक बोलावून चर्चा केली. तसेच जगभरात वेगाने वाढणाऱ्या या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला. ज्यामध्ये २४ तास विशेष बाह्यरुग्ण विभाग सुरु ठेवून तेथे वरिष्ठ अधिकारी नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला. हा अधिकारी संशयित रूग्णांना मार्गदर्शन करेल. अधिकाऱ्यांबरोबरच प्रत्येक प्रवेशद्वार आणि सुरक्षारक्षक यांना स्टेरेलियम उपलब्ध करून दिले जाणार आहे.
दरम्यान, गोव्यात दाखल केलेल्या एकाही संशयित रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आलेली नाही. संशयास्पद रुग्णांना हाताळण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. अशाही परिस्थितीत पॉझिटिव्ह रुग्ण आढळला तरी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.