अमरावती - आंध्र प्रदेश सरकारने शनिवारी आयपीएस अधिकारी ए. बी. व्यंकटेश्वर राव यांना निलंबित केले आहे. राव यांच्यावर सुरक्षा उपकरणांच्या खरेदी प्रक्रियेत गंभीर गैरव्यवहाराचे आरोप लावण्यात आले आहेत. याशिवाय, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही केले आहेत.
राज्याच्या सध्याच्या पोलीस महासंचालकांच्या अहवालाच्या आधारे ७ फेब्रुवारीला हा निर्णय घेण्यात आला. राज्याचे मुख्य सचिव नीलम सौहेनी यांनी दिलेल्या शासकीय आदेशानुसार, राव यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.
'ऑल इंडिया सर्व्हिसेसच्या (डिसिप्लीन अॅण्ड अपील) नियम १९६९, ३ (१) नुसार, आंध्र प्रदेश सरकार एबी व्यंकटेश्वर राव, आयपीएस (एपी:१९८९), पोलीस महासंचालक, यांच्यावर तत्काळ प्रभावाने शिस्तभंगाची आणि निलंबनाची कारवाई करावी,' असे या सरकारी आदेशात (जीओ) म्हटले आहे.
या आदेशानुसार, निलंबनाच्या कालावधीदरम्यान राव यांना शासनाच्या परवानगीशिवाय त्यांचे विजयवाडा येथील मुख्यालय सोडून जाता येणार नाही.
व्यंकटेश्वर राव हे १९८९ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपी सरकारच्या कालावधीत राज्याच्या गुप्तहेर यंत्रणेचे प्रमुख होते. मात्र, जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआरसीपीचे सरकार आल्यानंतर मागील आठ महिने त्यांना कोणतेही नेमणूकपत्र सुद्धा न देता बाजूला ठेवण्यात आले होते.
जेव्हा व्यंकटेश्वर राव राज्य गुप्तहेर सेवेचे प्रमुख होते, तेव्हा हा गैरप्रकार करण्यात आल्याचे आरोप त्यांच्यावर आहेत.
राव यांच्याविषयीच्या एका गोपनीय अहवालात ते माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या खास मर्जीतील अधिकारी होते, असे म्हटले आहे. 'त्यांनी पोलीस विभागाच्या गुप्त माहितीच्या नियमाचा आणि कार्यप्रणालीचा भंग करत ती परदेशी संरक्षण सामग्रीचे उत्पादन करणाऱ्या कंपनीला उपलब्ध केल्याचे यात म्हटले आहे. यामुळे देशाच्या सुरक्षेला थेट धोका पोहोचला आहे. कारण, गोपनीयतेचे नियम आणि संकेत देशभरातील पोलीस खात्यातील प्रत्येकाला लागू होतात', असे यात पुढे म्हटले आहे.
'तपासातून समोर आलेल्या तथ्यांवरून गंभीर गैरवर्तन आणि अनियमितता झाल्याविषयीची पुरावे तयार झाले आहेत. यावरून संबंधित अधिकाऱ्याने जाणीवपूर्वक गैरव्यवहार केल्याचे आणि राज्यासह देशविरोधी कृती केल्याचे समोर आले आहे,' असे या गोपनीय अहवालात म्हटले आहे.