चंदीगड - भारतीय वायुसेनेचे एक लढाऊ विमान पंजाबमध्ये कोसळले आहे. पंजाबच्या होशियारपुर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या एका शेतामध्ये हे विमान कोसळले. यावेळी वैमानिकाने वेळीच विमानातून उडी घेतली होती. त्यामुळे त्याने सुरक्षित लँडिंग केली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देशाच्या वायुसेनेचे मिग-२९ हे लढाऊ विमान याठिकाणी कोसळले आहे. जालंदरच्या जवळ असणाऱ्या वायुसेनेच्या प्रशिक्षण तळावरील हे विमान होते. यामध्ये काही तांत्रिक अडचण असल्याचे वैमानिकाने उडी घेण्यापूर्वी सांगितले होते. एका हेलिकॉप्टरच्या सहाय्याने या वैमानिकाला वाचवण्यात आले आहे.
हा अपघात कसा झाला, याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.