नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे क्षेत्रातील सर्व वादग्रस्त मुद्दे सोडवण्यासाठी आणि शांतता प्रस्थापीत करण्यासाठी कटीबद्ध आहेत, असे आसाममधील भाजपाच्या मंत्रिमंडळातील वरिष्ठ नेते हेमंत बिस्वा शर्मा यांनी सांगितले.
केंद्रीय गृहमंत्री शाह नागा,उल्फा हे मुद्देही सोडवणार आहेत. मात्र, सुरवातीला ते राज्यादरम्यान असलेला सिमावाद सोडवण्यासाठी इच्छुक आहेत. सर्व राज्यांनी मिळून अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात लढा द्यावा, अशी त्यांची इच्छा आहे. ईशान्य भारतात शांतता टिकवून ठेवण्याशी संबंधित मुद्द्यांवर आम्ही चर्चा केली. शाह यांची कोरोना चाचणी सकारात्मक आल्यानंतही ते कामाबाबत तत्पर असून ईशान्य राज्यातील प्रश्न विसरले नाहीत, असे शर्मा म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वात त्रिपुरा आणि मिझोरममधील रेंग आदिवासी निर्वासितांचे प्रश्न, आसाममधील बोडो प्रश्न आणि मणिपूर आणि मिझोरममधील इनर लाइन परमिट हा मुद्दा यापूर्वीच सोडविला गेला आहे. आता आसाम आणि नागालँडशी संबंधित विषयांवर लक्ष केंद्रित केले असून आंतरराज्यीय सीमा विवाद सोडवण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.
सध्या नागालँडमध्ये राष्ट्रीय समाजवादी परिषद (एनएससीएन) ची 9 सदस्यीय टीम टी. मुइवा यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारशी चर्चा करणार आहे. येत्या 15 ऑगस्टनंतर औपचारिक चर्चेला सुरुवात करण्यासंदर्भात सोमवारपासून अनौपचारिक चर्चा करण्यात येत आहे.
एनएससीएन-आयएम हा ईशान्येकडील सर्वात प्रभावशाली बंडखोर गट आहे. या गटाने ऑगस्ट 1997 मध्ये युद्धबंदी करारावर स्वाक्षरी केल्यानंतर सरकारबरोबर चर्चेच्या अनेक फेऱया झाल्या आहेत.