नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रकृती गंभीर असल्याची चर्चा काही दिवसांपासून समाजमाध्यमांमध्ये होत होती. मात्र या केवळ अफवा असल्याचे स्वतः अमित शाहांनी स्पष्ट केले आहे. आपली प्रकृती ठीक असल्याचे सांगत त्यांनी आपल्या हितचिंतकांचे आभारही मानले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांमध्ये माझी प्रकृती गंभीर असल्याचे संदेश फिरत आहेत. काही लोकांनी तर माझ्या मरणाबाबतही ट्विट केले. देश सध्या कोरोनाशी लढत असताना, देशाचा गृहमंत्री म्हणून मीसुद्धा या सर्व कामामध्ये व्यग्र असल्यामुळे, या गोष्टींकडे मी दुर्लक्ष केले होते. काही लोकांना यातून असूरी आनंद मिळत होता, त्या लोकांचा विचार करुन मीही याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही.
मात्र माझ्या पक्षातील लोक, आणि माझे शुभचिंतक यांना माझी फारच चिंता लागून राहिली होती. त्यांच्या काळजी, ते करत असलेली चौकशी याकडे मी दुर्लक्ष करु शकलो नाही. त्यामुळेच आज मी स्पष्ट करत आहे, की मला कोणताही आजार झालेला नसून माझी प्रकृती अगदी उत्तम आहे.
हिंदू संस्कृतीनुसार अशा प्रकारच्या अफवांनी आपली प्रकृती अधिकच चांगली होते. त्यामुळे मला अशी आशा आहे, की लोक ही निरर्थक कामे सोडून स्वतःची कामे करतील, आणि मलाही शांतपणे माझे काम करु देतील. ज्या शुभचिंतकांनी खरोखरच माझ्या काळजीपोटी चौकशी केली, त्या सर्वांचे आभार. तसेच, ज्या लोकांनी अशा प्रकारच्या अफवा पसरवली त्यांच्याप्रती माझ्या मनात कोणताही द्वेष नाही. त्या लोकांचेही आभार. अशा प्रकारचा संदेश शाह यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिला आहे.