नवी दिल्ली - दिल्लीत गंभीर बनलेल्या कोरोना समस्येवर चर्चा करण्यासाठी केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. उद्या (सोमवारी) सकाळी 11 वाजता केंद्रीय गृहमंत्रालयात बैठक होणार आहे. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, आप आणि बहुजन समाजवादी पक्षाचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.
दिल्लीतील कोरोनाच्या परिस्थितीवर अमित शाह यांनी दोन बैठका घेतल्या आहेत. पहिल्या बैठकीला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया, दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन, राज्यपाल अनिल बैजल, केंद्रिय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. दुसरी बैठकीलाही वरिष्ठ अधिकारी हजर होते. मात्र, केजरीवाल गैरहजर होते.
सर्वपक्षीय बैठक आयोजित केल्याचा संदेश मिळाला असल्याचे दिल्लीचे काँग्रेस प्रमुख अनिल कुमार चौधरी यांनी सांगितले. दिल्ली सरकारला कोरोनाच्या लढ्यात मदत करण्यासाठी चार आयएएस अधिकाऱ्यांची दिल्लीत बदली करण्यात आली आहे. यातील दोन अधिकारी अंदमान निकोबार बेटांवर कार्यरत होते तर इतर दोन अरुणाचल प्रदेशमध्ये होते.
दिल्लीतील कोरोना व्यवस्थापनावरून अरविंद केजरीवाल सरकारवर सर्वोच्च न्यायालयाने काल ताशेरे ओढले. मृतदेहांच्या व्यवस्थापनावरूनही प्रशासनाला फटकारले. सर्व देशात कोरोनाच्या चाचण्या वाढत असताना दिल्लीत कोरोना चाचण्या कमी झाल्याचे न्यायालयाने म्हटले. दिल्लीमध्ये 22 हजार 700 कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यातील सुमारे 14 हजार बरे झाले असून 1 हजार 271 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 38 हजार 958 नागरिकांना संसर्ग झाला आहे.