नवी दिल्ली - भारतीय रेल्वेने राजधानी एक्सप्रेसच्या २ गाड्यातील पार्सल ने-आण करण्याची जबाबदारी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनवर सोपवली आहे. प्रायोगिक तत्वावर ही सेवा सुरू झाली आहे. परंतु, यामुळे हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गंडातर येण्याची शक्यता आहे. यामुळे कर्मचाऱ्यांनी याचा विरोध सुरू केला आहे.
अॅमेझॉन इंडियाने मागील काही दिवसांपूर्वी प्रायोगिक तत्वावर पार्सल सुविधा सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वेला दिला होता. या प्रस्तावाला होकार देताना रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सियालदाह राजधानी एक्सप्रेस आणि मुंबई राजधानी एक्सप्रेस या २ गाड्यांसाठी पार्सल सुविधा सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे, या गाड्यांमध्ये गार्डच्या डब्यासोबत असलेल्या एसएलआरमध्ये पार्सलची जागा अॅमेझॉनला मिळाली आहे. ४ टन क्षमता असलेल्या या डब्यामध्ये २.५ टन जागा अॅमेझॉनच्या पार्सलसाठी राखीव आहे. ही जागा भरल्यानंतर उर्वरित १.५ टन जागेवर सामान्य नागरिक आणि रेल्वेचे सामानाची ने-आण करण्यात येणार आहे. प्रस्तावानुसार, फक्त १ महिन्यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली आहे. परंतु, यामध्ये २ महिने मुदतवाढही दिली जाऊ शकते.
कर्मचाऱ्यांचा विरोध
रेल्वे बोर्डाने उत्तर, पूर्व आणि पश्चिम रेल्वेच्या मुख्य व्यवस्थापकांना लवकरात लवकर ही योजना सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, स्थानकावर मालवाहतूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या यूनियनने याला विरोध केला आहे. यूनियनचे अध्यक्ष राज कुमार इंदोरिया यांनी आरोप करताना म्हटले आहे, की रेल्वेने कोणतेही निविदा न काढता खासगी कंपनीसोबत करार केला आहे. यामुळे हजारो नोकऱ्या जाण्याचा धोका आहे. याविरोधात ३१ जुलै आणि १ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली, दिल्ली आणि निजामुद्दीन रेल्वे स्थानकावर कोणत्याही मालाची चढ-उतार करणारे कर्मचारी संपावर जाणार आहेत.