नवी दिल्ली - कारगिल युद्धाला आज २० वर्षे पूर्ण झाली आहेत. या युद्धात 26 जुलै 1999 रोजी भारताला विजय मिळाला होता. या स्मरणार्थ दर वर्षी 26 जुलैला कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. कारगिलमधील मोठ-मोठ्या शिखरांवर पाकिस्तानी घुसखोरांनी ताबा मिळवला होता. यानंतर भारताने 'ऑपरेशन विजय' आखून या घुसखोरांना येथून पिटाळून लावले होते. तब्बल 80 दिवस चाललेले हे ऑपरेशन विजय भारताच्या विजयानंतर संपले. ऑपरेशन विजय ८ मे'ला सुरू होऊन 26 जुलैपर्यंत चालले होते. या युद्धात भारतमातेचे अनेक सुपुत्र कामी आले होते.
अशी झाली होती ऑपरेशन विजयची सुरुवात -
अत्यंत महत्वाचा असा राष्ट्रीय राजमार्ग 1 ए (श्रीनगर-लेह राजमार्ग) तोडणे, एलओसीची स्थिती बदलणे आणि काश्मीर खोऱ्यासह जम्मू-काश्मिरात फुटीरतावादाला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने पाकिस्तानी सैन्याने कारगिल भागात घुसखोरी आणि ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला होता.
यांना सर्वप्रथम दिसले होते घुसखोर पाकिस्तानी सैनिक -
जम्मू-काश्मिरातील गरखोन गावातील ताशी नामग्याल नावाच्या एका मेंढपाळाने ३ मे १९९९ रोजी बटालिकमधील जुबर रिगलाईन येथे सर्वप्रथम घुसखोर पाहिले. हा मेंढपाळ त्याच्या दोन मित्रांसोबत हरवलेल्या याकला शोधत होता. यावेळी त्याने सहा पाकिस्तानी सैनिकांना काळ्या पठाणी पोशाखात पाहिले आणि तत्काळ याची माहिती भारतीय लष्कराला दिली.
असा केला हल्ला -
मेंढपाळाने दिलेल्या माहितीनंतर भारतीय लष्कराने ५ मे रोजी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गस्ती पथक पाठवले. पथक गस्त घालत असतानाच अचानकपणे कॅप्टन सौरभ कालीया पथकातून गायब झाले. यानंतर २६ मे रोजी भारतीय हवाईदलाने या भागात एअर स्ट्राइकला सुरुवात केली. यात पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय हवाई दलाचे मिग-२७ पाडले आणि हवाईदलाच्या एका पायलटला युद्धबंदी बनवले.
युद्धाचे ढग -
या घटनेनंतर भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी कारगिल भागात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असल्याची घोषणा केली. यानंतर काही दिवसांनी पाकिस्तानने आपल्या सहा वीर जवानांचे शव छिन्न-विच्छिंन अवस्थेत परत केले. यामुळे भारताला पाकिस्तानविरुद्ध युद्धाची घोषणा करणे अपरिहार्य झाले.
युद्धाला सुरुवात -
तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी युद्धाची घोषणा करताच भारताने पाकिस्तानविरुद्ध थेट लष्करी कारवाई सुरू करत ऑपरेशन विजयला सुरुवात केली. यानंतर श्रीनगर-लेह महामार्ग कुठल्याही प्रकारच्या पाकिस्तानी धोक्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी भारताने कारगिल आणि द्रास भागात चढाईला सुरुवात केले. यात हवाई हल्ल्याचाही समावेश होता.
पाकिस्तानी परराष्ट्रमंत्री धावत दिल्लीत -
भारताने केलेल्या या कारवाईनंतर पाकिस्तानची झोप उडाली. त्यांचे परराष्ट्रमंत्री शांतता चर्चेसाठी दिल्लीत धावत आले. तेव्हा यशवंत सिन्हा हे भारताचे परराष्ट्र व्यवहारमंत्री होते. यावेळी त्यांनी, सर्वप्रथम पाकिस्तानने भारतीय हद्दीत केलेली घूसखोरी मागे घ्यावी, असे म्हणत पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांच्या वाटाघाटीचा प्रस्ताव धुडकावून लावला होता.
युद्ध काळातच वाजपेयी यांची कारगिलला भेट -
युद्धाला तोंड फुटल्यानंतर भारताने लवकरच टोलोलिंग पहाडावर ताबा मिळवला. नंतर जो संपूर्ण युद्धात अत्यंत निर्णायक आणि महत्वाचा ठरला. याच काळात कारगिल भागात जबरदस्त शेलिंग होत असतानाच पंतप्रधान वाजपेयी यांनी कारगिलला भेट दिली. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी 15 जूनला पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांना कारगिलमधून बाहेर निघायला सांगितले. तसेच मोठ्या लष्करी कारवाईवर संय्यम ठेवल्याबद्दल भारताची प्रशंसाही केली.
ऑपरेशन विजय यशस्वी -
भारतीय जवानांनी ४ जुलै १९९९ रोजी टायगर हिल ताब्यात घेतले. यानंतर ५ जुलैला नवाज शरीफ यांनी वॉशिंग्टन येथे क्लिंटन यांची भेट घेतली आणि कारगिलमधून पाकिस्तानी सैन्य माघारीघेत असल्याचे घोषित केले. यावर प्रत्यक्षात ११ जुलैला पाकिस्तानने कारगिलमधून सैन्य मागे घ्यायला सुरुवात केली. आणि १४ जुलैला भारताने ऑपरेशन विजय यशस्वी झाल्याचे जाहीर केले.
अखेर, २६ जुलैला कारगिल युद्ध संपुष्टात आले आणि भारताने पाकिस्तानी सैनिकांना भारतीय सिमेतून पूर्णपणे हाकलल्याची घोषणा केली.
आपले वीर जवान -
अखेर भारताने हे युद्ध जिंकले. या युद्धात भारतमातेचे अनेक वीर सुपुत्र कामी आले. यात रायफलमॅन संजय कुमार, ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव, कॅप्टन विक्रम बत्रा, कॅप्टन मनोज कुमार पांडे, कॅप्टन अनुज नायर, कॅप्टन एन केंगुरूस, लेफ्टनंट किशिंग क्लिफोर्ड नोंगरूम, भारतीय लष्कराचे मेजर पद्मपाणी आचार्य, मेजर राजेश सिंग अधिकारी, कर्नल सोनम वांगचुक, मेजर विवेक गुप्ता आणि नाईक दिगेंद्र कुमार, अशी काही सुपुत्रांची नावे सांगता येतील.