नवी दिल्ली - कोरोनाचा जगभरातील प्रसार पाहता आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर आज (सोमवार ) देशातील कोरोनाबाधित रुग्णाची आकडेवारी पाहता आंतरराज्यीय उड्डान सेवाही स्थगित करण्यात आली आहे. 24 मार्च रात्रीपासून उड्डान सेवा बंद करण्यात येणार आहे. दरम्यान कार्गो सेवा देणाऱ्या विमांनाना हा नियम लागू होत नाही.
यापूर्वी कोरोना विषाणूच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर इटली, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, दक्षिण कोरिया आणि श्रीलंकेला जाणारी विमाने एअर इंडियाने रद्द केली होती. संसर्गजन्य कोरोनाचा प्रसार होत असताना प्रवाशांच्या संख्येत घट झाली आहे. कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी जगभरातील देशांनी मागदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्याचा मोठा फटका विमान वाहतूक उद्योगाला बसला आहे. अनेक महत्त्वाचे कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आहेत.
कोरोना विषाणूने जगभरामध्ये थैमान घातले आहे. भारतामध्येही दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. याला आळा घालण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. देशातील अनेक राज्यांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे.