नवी दिल्ली - पाकिस्तानचे प्रधानमंत्री इमरान खान यांनी गुरुवारी दहशतवादी ओसामा बिन लादेन याला 'शहीद' असे संबोधले. त्यावरून नवीन वादाला तोंड फुटले आहे. खान यांच्या वक्तव्याचा अजमेर दर्ग्याचे अध्यात्मिक प्रमुख सय्यद जैनुल अबेदीन अली खान यांनी निषेध केला.
इम्रान खान यांचे एका दहशतवाद्याला “शहीद” असे संबोधणे प्रतिबिंबित करते की, दहशतवाद हा पाकिस्तानच्या राज्याच्या धोरणाचाच एक भाग आहे, असे अबेदीन यांनी शनिवारी एका निवेदनात म्हटले आहे. दहशतवादाला चालना देण्यासाठी चीनसारख्या देशांनी पाकिस्तानसारख्या देशांना शस्त्रे व आर्थिक पाठबळ दिले, असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, इम्रान खान यांनी गुरुवारी अल-कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याचा उल्लेख ‘शहीद’ असा केला. दहशतवादाविरुद्ध अमेरिकेने युद्ध पुकारले त्यामध्ये सहभागी झाल्याने पाकिस्तानला अडचणींचा सामना करावा लागला, असे वक्तव्यही खान यांनी केले. पाकिस्तानला कोणतीही कल्पना न देता अमेरिकेचे सैन्य पाकिस्तानमध्ये आले आणि त्यांनी लादेनला ठार केले त्यानंतर प्रत्येक जण पाकिस्तानला लाखोली वाहू लागला, असे वक्तव्य इम्रान खान यांनी तेथील संसदेत केले.