नवी दिल्ली - एअर एशिया विमान कंपनीच्या भारतीय विभागाने सुरक्षा दलातील जवानांसाठी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ऑफर देण्याची घोषणा केली आहे. या ऑफर अंतर्गत ५० हजार सीट सुरक्षा दलातील जवानांना बेस फेअर(मूळ भाडे) शिवाय देण्यात येणार आहेत. म्हणजेच जवानांना भाड्यात सूट मिळणार आहे. २५ सप्टेंरबर ते ३१ डिसेंबर या काळात देशांतर्गत प्रवासासाठी ही ऑफर असणार आहे.
'रेडपास' असे या ऑफरचे नाव ठेवण्यात आले आहे. विमानतळ शुल्क, इतर शुल्क आणि करातून सुरक्षा दलाच्या जवानांना सुटका मिळणार आहे. लष्कर, नौदल, हवाई दल, निमलष्करी दल, तटसुरक्षा दल आणि निमलष्करी दलातील जवानांना या ऑफरचा फायदा घेण्यात येणार आहे. याशिवाय प्रशिक्षणार्थी जवानांनाही या ऑफरचा फायदा घेता येणार आहे.
प्रवास करण्याआधी २१ दिवस तिकीट आरक्षित करावे लागणार आहे. तसेच एका बाजूच्या प्रवासासाठी ऑफरचा फायदा घेता येणार आहे. पत्रक जारी करून एअर एशियाच्या भारतातीत कार्यालयाने ही माहिती दिली.
योजनेचा फायदा घेण्यासाठी जवानांना अर्ज करावा लागणार आहे. अर्जाची छानणी झाल्यानंतर ही सूट मिळणार आहे. देशांतर्गत प्रवासासाठी ही ऑफर असणार आहे. विमानातून प्रवास करतेवेळी आणि सामान जमा करतानाही जवानांना प्राधान्य मिळणार आहे.
कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर विमान प्रवास क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. देशांतर्गत आणि आंतराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध असल्याने विमान कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागला. त्यामुळे विमान कंपन्यांनी खर्चात कपात करण्याचे पाऊल उचलले. विनापगार सुट्टी, कर्मचारी कपात अशी पाऊले विमान कंपन्यांकडून उचलण्यात आली.