नवी दिल्ली - दिल्लीमध्ये हवेची पातळी अत्यंत घसरीली आहे. हवेमध्ये सतत बदल होत आहे, दिल्लीमध्ये दिवसेंदिवस वाढत असलेल्या प्रदूषणामुळे हवेचा दर्जा अत्यंत निकृष्ट झाला आहे. तज्ज्ञांनी दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त केली आहे. दिल्लीतील वाढत्या वायु प्रदुषणाचा परिणाम तेथील नागरिकांवर होत असल्याचे देखील समोर आले आहे.
दिल्लीमध्ये फुफ्फुस, हृदय आणि रक्तवाहिन्यांसबंधी आजार असलेल्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. याला दिल्लीतील वायु प्रदुषणच जबाबदार असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. तसेच या वायु प्रदुषणाचा परिणाम हा बालकांच्या मेंदूच्या विकासासठी देखील अडथळा ठरत असल्याचे समोर आले आहे.
असोसिएशन ऑफ हेल्थकेअर प्रोव्हाईडर्सने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका अहवालामध्ये असे आढळून आले आहे की, दरवर्षी भारतात वायु प्रदुषणामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे 1.67 दशलक्ष मुलांचा मृत्यू होतो. तर अनेक जणांना गंभीर आजारांना समोर जावे लागते. ज्या भागांमध्ये हवेची पातळी ही निकृष्ट असते, अशा परिसरात जन्माला येणारी मुले जन्मताच कमी बुद्ध्यांक असलेली असतात असे देखील या अहवालात नमुद करण्यात आले आहे.