नवी दिल्ली - एअर मार्शल आर.के.एस भदौरिया भारताचे पुढील हवाई दल प्रमुख असणार आहेत. संरक्षण मंत्रालयाने याबाबतची घोषणी गुरूवारी केली. सध्याचे वायूदल प्रमुख बी. एस धनोवा ३० सप्टेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर भदौरिया कार्यभार स्वीकारणार आहेत.
भदौरिया यांची मे २०१९ पासून वायू सेनेच्या 'व्हाईस चीफ' पदी नियुक्ती करण्यात आली होती. आता 'चीफ ऑफ एअर स्टाफ' पदी यांची निवड केल्याची घोषणा संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने ट्विटरवरून केली.
फ्रान्सबरोबरच्या राफेल फायटर विमानांच्या खरेदी व्यवहारात भदौरिया यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. १९८० साली ते फायटर पायलट म्हणून एअर फोर्समध्ये रुजू झाले. राष्ट्रीय संरक्षण अकादमीत प्रथम येत त्यांनी 'स्वार्ड ऑफ ऑनर' पारितोषिक मिळवले होते.
४ दशकाच्या सेवेमध्ये त्यांनी एअर फोर्समध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळलेल्या आहेत. त्यांनी 'जॅग्वार स्कॉड्रन'चे नेतृत्त्व केले आहे. तसेच 'नॅशनल फ्लाईट टेस्ट सेंटर'मध्ये त्यांनी 'चीफ टेस्ट पायलट' आणि 'प्रोजेक्ट डारेक्टर' म्हणून काम पाहिले आहे.
भदौरिया यांच्याकडे ४२५० तासांपेक्षा जास्तवेळ उड्डाणाचा अनुभव आहे. त्यांना फायटर, ट्रान्सपोर्ट विमानांसह वेगवेगळ्या प्रकारचे २६ विमाने उड्डाणाचा अनुभव आहे. भदौरिया यांना परम विशिष्ट सेवा मेडल, अति विशिष्ट सेवा मेडल आणि वायू सेना मेडलने गौरवण्यात आले आहे.