भटिंडा - आकाशात ढगाळ वातावरण असताना विमान रडारच्या कक्षेत येत नाहीत, असे वक्तव्य केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांकडून ट्रोल झाले होते. मात्र, मोदींचा दावा खरा असून ढगाळ वातावरणात रडारला लढाऊ विमाने शोधण्यास अडचणी येतात, अशी माहिती हवाई दलाचे कमांडिंग इन चीफ रघुनाथ नांबियार यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एका मुलाखतीत पंतप्रधान मोदी यांनी एअरस्ट्राईक वेळी मी ढगाळ वातावरण असताना हवाई दलाला हल्ला करण्याचा सल्ला दिला होता. जेणेकरून शत्रुच्या रडारला आपली विमाने दिसणार नाहीत. मोदींच्या या दाव्यामुळे त्यांची समाजमांध्यमांवर चांगलीच खिल्ली उडवली गेली. विरोधकांनी त्यांना प्रचंड ट्रोल केले. मात्र, आता हवाई दलाच्या आधिकाऱ्यांनी मोदींच्या वक्तव्याचे समर्थन केले. रडार हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काही रडार हे ढगाळ वातावरणातही विमानांची स्थिती जाणू शकतात. मात्र, काही रडारमध्ये ती क्षमता नसते, असे ते म्हणाले.
बालाकोट येथे करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकवेळी मिराज २००० ही विमाने वारण्यात आली होती. रात्रीच्या वेळी हा हल्ला करण्यात आला होता. यावेळी केलेल्या हवाई हल्ल्यात २०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाल्याचा दावा सरकारने केला होता.