नवी दिल्ली - जपानमधील डायमंड प्रिन्सेस या जहाजावरील 119 भारतीय आणि 5 परदेशी नागरिकांना घेऊन एअर इंडियाचे विशेष विमान नवी दिल्लीत पोहोचले. यानंतर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी जपानी अधिकाऱ्यांचे आणि एअर इंडियाचे आभार मानले. कोरोना विषाणूच्या प्रसारानंतर जपानच्या योकोहामा बंदरावर डायमंड प्रिन्सेन हे जहाज अलिप्त ठेवण्यात आले होते.
एअर इंडियाच्या विशेष विमानात 119 भारतीय आणि श्रीलंका, नेपाळ, दक्षिण आफ्रिका, पेरू या देशांच्या पाच नागरिकांनाही नवी दिल्लीत आणण्यात आले.
दरम्यान, कोरोना विषाणूमुळे चीनमध्ये मृतांचा आकडा 2 हजार 744 झाला आहे. येथे या महिन्यात आतापर्यंत 29 जण मृत्युमुखी पडले आहेत. 433 कोरोनाचे नवे रुग्ण समोर आल्याची माहिती राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (एनएचसी) दिली आहे. देशात सध्या 78 हजार 500 लोक कोरोना बाधित असल्याची अधिकृत माहिती मिळाली आहे.
वुहान येथून पहिला कोरोनाचा रुग्ण मागील वर्षी डिसेंबरमध्ये प्रथम निदर्शनास आला होता. यानंतर याचा वेगाने प्रसार झाला होता. मागील काही आठवड्यांत याची तीव्रता कमी झाल्याचे दिसत आहे.