चंदीगड – कोरोनाच्या संकटात विदेशात अडकलेल्या 144 भारतीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रवाशांना वंदे भारत मिशनअंतर्गत खास विमान पाठवून युक्रेनमधून मायदेशी आणण्यात आले आहे.
सरकारी अधिकाऱ्याच्या माहितीप्रमाण एअर इंडिया उड्डाण क्रमांक एआय 1928 मधून 144 भारतीयांना बोरीसपोलमधून (युक्रेन) दिल्लीला आणण्यात आले. त्यानंतर दिल्लीतून चंदीगड आंतरराष्ट्रीय विमानतळावार हे विमान आज दुपारी 12 वाजून 50 मिनिटाला पोहोचले.
यामधील बहुतेक प्रवासी पंजाब आणि शेजारील राज्यांमधील रहिवासी आहेत. ते सरकारी प्रतिनिधींच्या देखरेखीखाली त्यांच्या जिल्ह्यात पोहोचतील, असे अधिकाऱ्याने सांगितले. त्यांना केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे.
काय आहे वंदे भारत मिशन?
विदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी 7 मेपासून वंदे भारत मिशन सुरू करण्यात आली आहे. सध्या ही मोहिम तिसऱ्या टप्प्यात आहे. नवीन टप्प्यातील वंदे भारत मिशन मोहिम ही 11 जूनपासून सुरू झाली आहे. तिसऱ्या टपप्यात 550 आंतरराष्ट्रीय प्रवासाची विमान उड्डाणे झाली होती. वंदे भारत मिशन सुरू झाल्यापासून गेल्या महिन्यापर्यंत 2 लाख 50 हजार 87 लोकांना विदेशातून भारतात आणण्यात आल्याची परराष्ट्र मंत्रालयाने माहिती दिली होती.