नवी दिल्ली - भारत आणि पाकिस्तानदरम्यानची तणावपूर्ण परिस्थिती पाहता आता हवाई दल, नौदल प्रमुखांना 'झेड प्लस' सुरक्षा व्यवस्था देण्यात येणार आहे. भारत-पाक तणावपूर्ण स्थितीच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी करण्यासंबंधीचा आदेश पारित करण्यात आला आहे.
या आदेशात दिल्ली पोलिसांना एअर चीफ मार्शल बिरेंदर सिंग धानोआ आणि अॅडमिरल सुनील लांबा यांना तातडीने ही सुरक्षा व्यवस्था पुरवण्याचे आदेश दिले आहेत. दिल्ली पोलिसांनीही अशा प्रकारचा आदेश मिळाला असून तो आजपासून अंमलात येणार असल्याचे सांगितले आहे.
लष्करप्रमुखांना आधीपासून पुरेशी सुरक्षा व्यवस्था होतीच. आता तणावपूर्ण परिस्थिती आणि वाढता धोका लक्षात घेता हवाई दल प्रमुख आणि नौदलप्रमुखांचीही सुरक्षा लष्करप्रमुखांइतकीच वाढवण्याचा निर्णय झाला, असे गृहमंत्रालयाच्या अधिकाऱयाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे.
झेड प्लस ही देशातील सर्वांत वरच्या दर्जाची सुरक्षा व्यवस्था आहे. यात तब्बल ५५ रक्षकांकडून सुरक्षा देण्यात येते. त्यात १० राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या जवानांचा समावेश असतो. हे जवान अत्याधुनिक एमपी ५ बंदुका आणि संपर्क यंत्रणेसह सज्ज असतात.