नवी दिल्ली/गाझियाबाद - काँग्रेस पक्षात मागील काही दिवसांपासून अध्यक्ष पदासाठी योग्य व्यक्तीची शोधाशोध सुरू आहे. कोणताही अंतिम निर्णय न झाल्यामुळे सोनिया गांधींनाच काँग्रेस अध्यक्षपदाचा हंगामी कार्यभार देण्यात आला. यानंतर लखनऊ मतदार संघातील काँग्रेस उमेदवार राहिलेले आणि कल्की पीठाधीश्वर आचार्य प्रमोद कृष्णम यांनी ट्विटरवरून 'काँग्रेस कार्यसमितीचे राहुल गांधींच्या विरोधात षडयंत्र सुरू असल्याचा' गंभीर आरोप केला आहे.
राहुल गांधींची 'अभिमन्यु'सारखी एकाकी झुंज
२०१९ च्या 'महाभारतात' राहुल गांधी एकटेच 'अभिमन्यु'सारखी एकाकी झुंज देत आहेत. तर, दुसरीकडे काँग्रेस कार्यसमिती मौज-मजा करत आहे. त्यामुळे राजीनामा राहुल गांधीनी नव्हे तर, 'कार्यसमितीने' देणे आवश्यक होते, असे आचार्यांनी म्हटले आहे.
कार्यसमितीवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह
'मोदीसेनेच्या चक्रव्यूहात राहुल गांधी अभिमन्युसारखे एकटे पडले. काँग्रेस पक्षाचा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये नामुष्कीजनक पराभव झाला. या पराभवाची जबाबदारी केवळ राहुल गांधींचीच आहे का? काँग्रेस कार्यसमिती बरखास्त का करू नये? त्यातील सदस्यांनी राजीनामा का देऊ नये,' असे ट्विट आचार्य यांनी केले आहे.
राहुल गांधींचे म्हणणे मान्य केले नाही
'एका बाजूला कार्यसमितीने राहुल गांधींचा राजीनामा मंजूर केला. तर, दुसऱ्या बाजूला राजीनामा देताना राहुल गांधींनी 'गांधी परिवारा'तील कोणीही काँग्रेस अध्यक्ष राहणार नाही, असे म्हटले होते. कार्यसमितीने याकडेही लक्ष दिले नाही. राहुल यांच्या विरोधात षडयंत्र रचले जात आहे. राहुल प्रचार करत होते, तेव्हा कार्यसमिती काय करत होती? राजस्थान, हरियाणा, जम्मू काश्मीर राज्यात काँग्रेसला 'व्हाईटवॉश' मिळाला. या राज्यांच्या काँग्रेसच्या मुख्य कार्यकर्त्यांनी राजीनामा का देऊ नये? माझी सोनिया गांधींना विनंती आहे की, त्यांनी कार्यसमिती बरखास्त करून पुन्हा निवडणुका घ्याव्यात. यानंतर अध्यक्ष कोण राहील, यासंदर्भात निर्णय घेतला जावा, असे आचार्य यांनी म्हटले आहे.