हरीद्वार - उत्तराखंडमध्ये पतंजली आयुर्वेदाचे सहसंस्थापक आचार्य बाळकृष्ण (वय 47) यांना आज छातीत दुखत असल्यामुळे ऋृषिकेशमधील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सध्या बाळकृष्ण यांची प्रकृती ठीक असून चिंतेची गोष्ट नाही. छातीत दुखत असल्यामुळे त्यांना हरिद्वार येथील भुमानंद रुग्णालयात दाखल केले होते. मात्र प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना एम्समध्ये हलवण्यात आले. शुक्रवारी दुपारी पंतजली संस्थेच्या कार्यालयात काम करताना त्यांच्या छातीत कळा आल्याचे बाबा रामदेव यांचे प्रवक्ता तीजारावाला यांनी सांगितले.
बाळकृष्ण यांचे संशोधनातही मोठे योगदान असून त्यांनी सहलेखकांसमवेत आतापर्यंत अनेक शोधनिबंध लिहिले आहेत. हे सर्व शोधपत्र योग, आयुर्वेद आणि औषधांसंबंधी आहेत. दरम्यान पतंजली भारतातील सर्वात वेगाने विकसित होणारा कंज्युमर ब्रँड आहे. पतंजली आयुर्वेदचे ९४ टक्क्यांपेक्षा जास्त मालकी हक्क बाळकृष्ण यांच्याकडे असल्याचे सांगितले जाते.