लंडन - पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी सध्या इग्लंडमध्ये वास्तव्यास आहे. लंडनच्या रस्त्यांवर मोदी सध्या मोकळेपणाने फिरताना दिसत आहे. 'द टेलिग्राफ' या वृत्तपत्राने मोदीचा एक व्हिडिओ जारी केला आहे. यात नीरव मोदी लंडनच्या रस्त्यांवर फिरताना दिसत आहे.
मोदीला टेलिग्राफच्या प्रतिनिधीने अनेक प्रश्नही विचारलेले या व्हिडिओमध्ये दिसत आहे. मात्र, मोदीने कुठल्याच प्रश्नाला उत्तर दिले नाही. पत्रकाराच्या प्रत्येक प्रश्नाला मोदीने उत्तर देणे टाळले. पीएनबी या १३ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यात नीरव मोदी प्रमुख आरोपी आहे. गेल्यावर्षी मोदी भारतातून फरार झाला होता. गेल्यावर्षी जुलैमध्ये भारताच्या मागणीवरुन मोदीविरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती.
मोदीच्या भारतातील सर्व मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. अलिबाग येथे असलेला मोदीचा बंगलाही प्रशासनाने ताब्यात घेतला आहे. स्फोटांच्या साहाय्याने हा बंगला पाडण्यात आला.