नवी दिल्ली - तिहेरी तलाक विरोधात 1 ऑगस्ट 2019 रोजी कायदा मंजूर करण्यात आला. तेव्हापासून देशात 82 टक्के तिहेरी तलाकच्या घटना कमी झाल्याचे अल्पसंख्यंक मंत्री अब्दुल मुख्तार नक्वी यांनी म्हटले आहे. ज्या दिवशी कायदा लागू झाला तो दिवस म्हणजे 1 ऑगस्ट हा मुस्लिम महिला हक्क दिवस असल्याचे ते म्हणाले.
तिहेरी तलाकची घटना कोठे ही घडली की मुस्लिम महिला(विवाह हक्क संरक्षण) कायदा 2019 नुसार कारवाई करण्यात येते. ‘तिहेरी तलाक चागंली सुधारणा, चांगला निकाल’ असा लेख प्रेस इन्फॉरमेशन ब्युरो या सरकारी संकेतस्थळावर टाकण्यात आला आहे. तिहेरी तलाक आणि तलाक- इ- बिद्दत ही प्रथा इस्लामिक नव्हती आणि कायदेशीरही नव्हती. मात्र, या सामाजिक कुप्रथेला मतांच्या राजकारणासाठी संरक्षण दिले गेले होेते, असे या लेखात नक्वी यांनी म्हटले आहे.
1 ऑगस्ट 2019 हा दिवस भारतीय संसदेच्या इतिहासात ऐतिहासिक आहे. स्वत:ला 'धर्मनिरपेक्षतेचे संरक्षक' समजणारे काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, बहुजन पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला असतानाही हा कायदा मंजूर झाला. भारतीय लोकशाहीतील हा सुवर्ण क्षण आहे, असे नक्वी यांनी म्हटले.
तिहेरी तलाक कायदा पास होऊन एक वर्ष झाले आहे. या काळात 82 टक्के तिहेरी तलाकची प्रकरणे कमी झाली. या सामाजिक कुप्रथेविरोधात 1986 साली कायदा पास होऊ शकला असता, जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने शहाबानो खटल्यात ऐतिहासिक निर्णय दिला होता. लोकसभेत आणि राज्यसभेत काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत असतानाही कायदा पास झाला नाही. त्याऐवजी राजीव गांधी सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय निष्प्रभ केला. अन् मुस्लिम महिलांना त्यांच्या वैधानिक आणि मुलभूत हक्कांपासून वंचित केले, असे नक्वी म्हणाले.