पणजी - मागील वर्षी गोवा विद्यापीठाने काही विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या वर्षात प्रवेश दिला होता. मात्र, यावर्षी अशा प्रकाराने विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला नाही. विद्यापीठाच्या या आडमुठ्या धोरणामुळे सुमारे 700 विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे, असा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेने (एनएसयुआय) केला आहे.
एनएसयुआयचे गोवा प्रदेश अध्यक्ष एराज मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी सकाळपासून पणजीतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना मुल्ला म्हणाले, गोवा विद्यापीठाशी संबंधित सर्व संबंधितांची भेट घेऊन म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु, कोणीच याकडे लक्ष देण्यास तयार नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही हे धरणे आंदोलन छेडले आहे. गोवा विद्यापीठाच्या या निर्णयाचा फटका 700 हून अधिक विद्यार्थ्यांना बसणार आहे.
मागील वर्षांपर्यंत काही विषय राहिलेल्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या वर्षांत प्रवेश दिला जात असे, तसाच प्रवेश यावेळी द्यावा. तिसऱ्या वर्षांत जर सदर विद्यार्थ्यांने आपले राहिलेले विषय पूर्ण सोडवले नाही. तर त्यांना पदवी देऊ नये. या मागणीसाठी आम्ही आवश्यक ते सर्व प्रयत्न करणार आहोत. प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर धरणे धरणार आहोत. तसेच विधानसभेसमोर निदर्शने करणार आहोत, असे मुल्ला म्हणाले.