पणजी - लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षातर्फे उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. दक्षिण गोव्यातून गोवा राज्य संयोजक एल्विस गोम्स, तर उत्तर गोव्यातून सरचिटणीस प्रदीप पाटगावकर हे निवडणूक लढविणार आहेत. या उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली असून लोकांचा प्रतिसादही चांगला मिळत असल्याची माहिती गोम्स यांनी दिली.
आप पक्षाने गोवा विधासभेची २०१७ ची सार्वत्रिक निवडणूक लढविली होती. तर आता लोकसभा निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत त्यांची काय भूमिका असेल याकडे लोकांचे लक्ष होते. परंतु, निवडणूक आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच काही काळ उमेदवारी जाहीर करून विविध भागांत प्रचाराला सुरुवात केली होती.
गोम्स म्हणाले, आता जेव्हा आम्ही ग्रामीण भागात प्रचाराच्या निमित्ताने फिरत असताना लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाने आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात घडविलेले बदल येथील लोकांना अपेक्षित आहेत. तर लोकसभेच्या निवडणूक प्रचाराला पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल, नेते मनिष सिसोदिया, संजय सिंह गोव्यात येणार आहे.
खाण प्रश्न काँग्रेसच्या काळात -
खाण व्यवसाय बंद झाल्यामुळे गोव्यातील खाण अवलंबितांनी नुकताच हजारोंच्या संख्येने मोर्चा काढला होता. तसेच नुकतेच गोवा दौऱ्यावर आलेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपण सत्तेत आल्यास कायद्याच्या चौकटीत राहून गोव्यातील खाण व्यवसाय सुरू करणार, असे आश्वासन दिले आहे. मात्र, गांधींना स्थानिक काँग्रेस नेतृत्वाने चुकीची माहिती दिली आहे. कारण, २००७ ते २०१२ या काळात हा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा गोव्यात काँग्रेस सत्तेवर होते. त्याचा लाभ उठवत मनोहर पर्रिकर यांनी सत्ता प्राप्त केली. परंतु, जर सरकारला इच्छा असेल तर खाण प्रश्न सुटला असता, असा टोला ही गोम्स यांनी भाजप व काँग्रेसला लगावला आहे.
गोम्स पुढे म्हणाले, खाण व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारने खाण अवलंबित, बार्ज मालक, ऑपरेटर्स, वाहनधारक आणि स्थानिक जनता यांना एकत्र आणून लोकांचे खाण धोरण ठरवावे, तसे करण्याला न्यायालयाने कोणत्याही प्रकारची बंदी घातली नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी सरचिटणीस प्रदीप पाडगावकर, सिद्धार्थ कारापूरकर उपस्थित होते.