पणजी (गोवा)- कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून राज्य सरकार आवश्यक ती खबरदारी घेत असतानाचा आज सकाळी एका २७ वर्षीय युवकाला गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. हा युवक दोन दिवसापूर्वी इटलीहून गोव्यात परतला होता. त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले.
२७ वर्षीय युवक जून २०१९ मध्ये दक्षिण गोव्यातून युरोपमध्ये कामासाठी गेला होता. फिनलँडमध्ये काही काळ काम केल्यानंतर तो फेब्रुवारी २०२० मध्ये इटलीमध्ये गेला. तेथे तो जहाजावर काम करत असताना कोरोना विषाणूच्या संपर्कात आला. दोन दिवसापूर्वी तो विमानाने गोव्यात दाखल झाला होता. ताप आणि खोखला येत असल्याने त्याला आज सकाळी गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, कोरोना विषाणूच्या भीतीने सध्या सुरू असलेल्या शिगमोत्सवाला देखील ग्रहन लागल्याचे दिसून येत आहे. या उत्सवात फार कमी लोक सहभागी होत आहेत.
सरकारनेही अधिक लोकांनी एकत्र येण्याचे टाळावे, अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे, लोक सावधानता बाळगताना दिसत आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये दाखल केलेल्या संशयितांपैकी एकाचाही अहवाल सकारात्मक आलेला नाही. त्यामुळे, उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. प्रशासनाकडून रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी विशेष प्रभाग तयार करण्यात आला आहे. तसेच रेल्वे, विमानतळ आणि जहाजामधून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे.
हेही वाचा- मध्यप्रदेश सरकारने ज्योतिरादित्य सिंधियासह आमदारांना पक्षात परतण्याचे केले आवाहन